या वर्षी लघुपटांना मिती लघुपट शिष्यवृत्ती योजना जाहीर.

Share This News

पुणे – मिती फिल्म सोसायटी तर्फे गेली चार वर्षे राष्ट्रीय पातळीवर मिती लघुपट महोत्सव आयोजित केला जातो. या वर्षी डिसेंबर मधे पर्यावरण या विषयावरील ५वा मिती लघुपट आणि माहितीपट महोत्सव आयोजित केला आहे. नविन लघुपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांना प्रोत्साहन म्हणून या वर्षी मिती फिल्म सोसायटी ४ लघुपटांना २५,००० रु. ची मिती शिष्यवृत्ती योजना जाहीर करत असल्याची माहिती मिती फिल्म सोसायटीचे अध्यक्ष व चित्रपट निर्माते मिलिंद लेले आणि उपाध्यक्ष व अभिनेते चंद्रशेखर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी मिती फिल्म सोसायटीचे सचिव आमोद खळदकर आणि खजिनदार अजिंक्य खरे उपस्थित होते. लेले म्हणाले, चित्रपट क्षेत्रात उत्तम दिग्दर्शक, अभिनेते, तंत्रज्ञ घडावेत या साठी मिती फिल्म सोसायटी वर्षभर उपक्रम राबवत असते लघुपट महोत्सव हा त्या पैकी एक उपक्रम आहे. शिष्यवृत्ती जाहीर केल्यामुळे लघुपट निर्मिती करण्यासाठी नवनवीन कल्पना घेऊन लोकं या मधे सहभागी होतील असा विश्वास चंद्रशेखर कुलकर्णी यांनी या वेळी व्यक्त केला.

शिष्यवृत्तीसाठी वयोमर्यादा ३० असून इच्छुकांनी ३० जून २०२५ पूर्वी आपल्या संहिता सादर करणे आवश्यक आहे. तसेच लघुपट ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.
लघुपटाच्या संहिता miteescholarship@gmail.com या वर मेल कराव्यात. अधिक माहितीसाठी दिलेल्या क्यू आर कोड मार्फत संपर्क साधावा.

फोटो ओळ – डावीकडून अजिंक्य खरे, मिलिंद लेले, चंद्रशेखर कुलकर्णी आणि आमोद खळदकर.