स्त्री आधार केंद्र , पुणें आणि महिला प्रबोधन व्यासपीठ , महाराष्ट्र संस्थांतर्फे ‘कोव्हिड काल आज आणि उद्या’ या एका विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रम शुभारंभात ‘गृहविलगीकरणाच्या मर्यादा ओळखुन छोट्या सामुहिक केंद्र स्वरूपात सामाजिक विलगीकरण व्यवस्था गरजेच्या ‘ डा. संजय ओक*

Share This News

*स्त्री आधार केंद्र , पुणें आणि महिला प्रबोधन व्यासपीठ , महाराष्ट्र  संस्थांतर्फे ‘कोव्हिड काल आज आणि उद्या’ या एका विशेष दृक्-श्राव्य कार्यक्रम शुभारंभात ‘गृहविलगीकरणाच्या मर्यादा ओळखुन छोट्या सामुहिक केंद्र स्वरूपात सामाजिक विलगीकरण व्यवस्था गरजेच्या ‘ डा. संजय ओक*

कार्यक्रमाच्या सुरुवातीला कार्यक्रमाच्या अध्यक्ष, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती मा. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या कार्यक्रमा मागची आपली भूमिका प्रेक्षकांसमोर मांडली. कोव्हिड काळात समाजात पसरलेली नकारात्मकता दूर करून सकारात्मक वातावरण तयार व्हावं हा या कार्यक्रमाचा हेतू आहे असं त्यांनी सांगितलं. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्या म्हणाल्या, **हा कार्यक्रम म्हणजे संजीवनी मिळून हयात असलेल्या मानवजातीचा उत्सव आहे आणि त्याचबरोबर एक दुःखाचा हुंदका सुद्धा आहे. कारण ज्यांच्या जीवनाची ज्योत मालवली त्यांच्यासाठी ही एक श्रद्धांजली आहे. या माध्यमातून समाजाला एक जगण्याची उमेद आणि मानवतेचा संदेश सुद्धा मिळणार आहे.*आजवर आपण सामोरे गेलेल्या इतर काही महामारींचा आणि संकटांचा उल्लेख देखील त्यांनी यावेळी केला. कोरोनाचं संकट अचानक आपल्यावर आल्यानंतर शासनाच्या पातळीवर केलेली उपाययोजना, डॉक्टर्स, नर्सेस तसंच अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या व्यक्तींनी समस्यांवर तोडगा कसा काढला याविषयी देखील त्यांनी सविस्तर माहिती दिली.

या कार्यक्रमात ‘कोरोना प्रतिबंध आणि गृहविलगीकरणाच्या दक्षता’ या विषयावर मार्गदर्शनार्थ चर्चा सत्राचा देखील समावेश होता. या चर्चासत्रात कोव्हिड टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक आणि मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर या मान्यवरांचा सहभाग होता.

कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात कोव्हिड टास्क फोर्सची निर्मिती कशी झाली, बैठकांमध्ये झालेल्या चर्चा, आणि प्रत्येक टप्प्यावर केलेल्या नवनवीन उपाययोजना, गृहविलगीकरण करताना आलेली आव्हानं याविषयी डॉ. संजय ओक यांनी आपल्या मनोगतातून माहिती दिली. कोरोना प्रतिबंधाविषयी टास्क फोर्सची भुमिका मांडताना ते म्हणाले की, “टास्क फोर्सच्या आत्तापर्यंत ६४ बैठका झाल्या. दर सोमवारी रात्री टास्क फोर्सची बैठक होते. ज्यात राज्यामध्ये कुठल्या ठिकाणी केसेस जास्त आहेत, कुठल्या प्रकारची लक्षणं दिसतायत, या सगळ्याचा उहापोह होतो आणि काही मार्गदर्शक तत्त्व आरोग्य खात्याला दिली जातात.” यापुढील काळात जर आपल्या समाजाने कोव्हिडच्या नियमांचं पालन आणि लसीकरण यांची कास धरली तर कदाचित आपल्याला तिसऱ्या लाटेला आपण योग्य रितीने समोरं जाऊ, असं देखील त्यांनी सांगितलं. तसेच *गृहविलगीकरणाला छोटी घरे असल्याने मर्यादा आहेत त्यामुळे वस्ती व गाव पातळींवर सामुहिक विलगीकरण व्यवस्था करून ठेवणे योग्य राहील असेही डा. ओक यांनी सुचविले*.

मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी मुंबईतील धारावी या ठिकाणी आलेले काही थक्क करणारे अनुभव आणि त्या परिस्थितीत केलेल्या उपाययोजना याविषयी मनोगत मांडलं. “सुरुवातीच्या काळात जेव्हा धारावीमध्ये आम्ही फिरलो, तेव्हा आमच्या लक्षात आलं कि २ स्वेअर किलोमीटरच्या क्षेत्रात सुमारे ८ ते १० लाख लोकसंख्या अशी परिस्थिती आहे. एका छोट्याशा १० बाय १५ च्या घरात ८ – १० लोकं रहात होती. शिवाय तिथे राहणाऱ्या सर्व व्यक्ती सार्वजनिक शौचालयाचा वापर करत होत्या. त्यामुळे आम्हाला मिळालेलं ट्रेनिंग आणि या प्रत्यक्ष परिस्थितीत त्याची योग्य अंमलबजावणी हे फार कठीण होतं. पण टास्क फोर्सच्या मार्गदर्शनाखाली वेळोवेळी नवीन उपाययोजना करत आम्ही हे काम सुरु ठेवलं.” असं किरण दिघावकर म्हणाले. या काळात संपूर्ण मुंबईत असलेला तणाव, लोकांना आलेल्या अडचणी, काही कटू अनुभव तर काही सकारात्मक अनुभव हे देखील त्यांनी व्यक्त केले.

याबरोबरच कोव्हिड १९ मधून बऱ्या झालेल्या रुग्णांचे अनुभव देखील कार्यक्रमात समाविष्ट होते. प्रसिद्ध गायक श्रीरंग भावे, विधानपरिषद उपसभापती कार्यालयाचे सचिव रवींद्र खेबुडकर आणि ITक्षेत्रातकाम करणा-या श्वेता अभिजित भावे, यांनी गृहविलगीकरणाचे आपले अनुभव प्रेक्षकांसमोर मांडले.
तसंच शालिनी मेहता, अस्मिता कोंडुसकर, शैलेश लिमये आणि नीलिमा जोशी यांनी देखील कोव्हिड काळातले त्यांचे अनुभव व्हिडीओज च्या माध्यमातून व्यक्त केले.

या संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांनी केलं. कार्यक्रमाचं संयोजन हे यांच्या मिती क्रिएशन्स या संस्थेतर्फे करण्यात आलं. हा कार्यक्रम स्त्री आधार केंद्र पुणे (Stree Aadhar Kendra) आणि Miti Group या फेसबुक पेजेसवर तसंच Miti Group Digital या युट्युब चॅनलवरून प्रसारित करण्यात आला.
यापुढील तीन शनिवारी म्हणजेच दिनांक १९ जून, २६ जून आणि ३ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता देखील कोविड काल आज आणि उद्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोनाविषयी अधिक माहिती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली जाईल.

या प्रत्येक भागात नागरिकांना आलेले सकारात्मक अनुभव देखील व्यक्त केले जातील. या अनुषंगाने नागरिकांना आपले अनुभव ५०० शब्दात लिहून पाठवण्याचं आवाहन देखील आयोजकांनी केलं आहे. तेव्हा आपले अनुभव ९९३०११५७५९, या क्रमांकांवर व्हॉट्सअॅपद्वारे पाठवा किंवा streeaadharkendra@gmail.com / neelamgorheoffice@gmail.com या ई-मेल आयडीवर मेल करा. अधिक माहितीसाठी संपर्क – ९०२८३३३३०५/०६

एकूणच सध्याच्या या निराशावादी वातावरणात बदल करून काही प्रेरणादायी अनुभवांच्या मदतीने एक आशावादी वातावरण तयार करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
चला तर मग जीवनाबाबत आशावादी राहूया आणि एकत्र येऊन एक संवेदनशील समाज घडवूया!!!