*विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे –  खासदार अॅड. वंदना चव्हाण यांचे मत* *सर्वपक्षीयांनी मैत्री जपावी – एकमेकांवर टीका करताना पातळी सोडू नये – जगदीश मुळीक.* *- मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

Share This News

पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला राज्यघटना दिली. त्यामध्ये सर्वधर्म समभाव आणि समतेचा संदेश दिलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण ते विसरून चाललोय की काय असा प्रश्न आज पडतो. अशा काळात मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा अतिशय महत्वाची आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना एकमेकांना भेटायला जमत नाही, खेळ तर दूरची गोष्ट आहे.  मात्र या स्पर्धेच्या निमित्ताने आजच्या गढूळ झालेल्या सामाजिक – राजकीय वातावरणात विविध विचाराधारेचे कार्यकर्ते आणि पत्रकार एकत्र येत आहे ही आनंदाची बाब आहे. विचारधारा कोणतीही असली तरी सर्वांचे ध्येय देशाला पुढे घेऊन जाणे हेच आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने हे काम खेळाच्या माध्यमातून होतेय  असे मत  राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्या, राज्यसभा  खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि छत्रपती कलाकार लीग निमंत्रित स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार अॅड. वंदना चव्हाण बोलत होत्या.
*सर्वपक्षीयांनी मैत्री जपावी आणि एकमेकांवर टीका करताना पातळी सोडू नये असे भाजप चे शहराध्यक्ष जगदीश मुळीक म्हणाले.सद्यस्थितीत राजकारण्यांकडे बघण्याचा सामान्यांचा दृष्टिकोण बदलत चालला आहे अश्या परिस्थितीत सर्व पक्षातील नेते,कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन समाजाला एक सकारात्मक संदेश द्यावा आणि कितीही मतभेद असले तरी मनभेद होऊ द्यायचे नाही असा ह्या मैत्री बॉक्स प्रीमियर लीग चा उद्देश असल्याचे स्पर्धेचे संयोजक मंदार जोशी व संदीप खर्डेकर म्हणाले.
याप्रसंगी आमदार माधुरीताई मिसाळ, भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक, शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळा चे मेघराज राजेभोसले, नगरसेविका मंजुश्री संदीप खर्डेकर,आर पी आय प्रदेश सचिव ऍड अर्चिता मंदार जोशी,काँग्रेस आय प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी ,राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ता ऍड रुपाली पाटील, युवासेनेचे किरण साळी, आयोजक ॲड मंदारभाऊ जोशी- भीमयोद्धा फाउंडेशन, संदीप खर्डेकर- क्रिएटिव्ह फाउंडेशन, रमेश परदेशी- छत्रपती कलाकार लीग आदि मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, भीमयोद्धा फाउंडेशनने या स्पर्धेच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र आणले आहे. आजच्या राजकीय परिस्थितिमध्ये ही बाब खूप गरजेचे आहे.
आज झालेल्या सामन्यात स्वयंसेवी संस्थांच्या टीम ने शिवसेना ( एकनाथ शिंदे ) यांचा पराभव केला. एन जी ओ च्या टीम ने शिवसेनेला अवघ्या 50 धावात गुंडाळले व ही धावसंख्या लीलया पार केली. शिवसेनेकडून नाना भानगिरे,किरण साळी, निलेश गिरमे, निलेश माजीरे,तर एन जी ओ टीमच्या वतीने शेखर मुंदडा, राहुल जगताप, अमोल उंबरजे, योगेश बजाज, गणेश बाकले यांनी उत्तम खेळी केली.
भारतीय जनता पार्टीने ने कलाकारांच्या टीम चा सहज पराभव केला.कलाकारांनी प्रथम फलंदाजी करताना 5 षटकात 63 धावा केल्या. समीर धर्माधिकारी, सुरेश विश्वकर्मा, चेतन चावडा यांनी चमकदार कामगिरी केली.तर भारतीय जनता पार्टीच्या सलामीच्या जोडीने दीपक पोटे व प्रतीक खर्डेकर यांनी जोरदार फटकेबाजी करत सहज विजय मिळविला. प्रतीक खर्डेकर (38) व दीपक पोटे ( 22) ह्या जोडीने नाबाद रहात विजय संपादन केला.यावेळी महिलांचा प्रदर्शनीय सामना झाला, यात ऍड. रुपालीताई पाटील,संगीताताई तिवारी, मंजुश्रीताई खर्डेकर,अर्चनाताई चंदनशिवे,सविताताई बलकवडे,प्रणेती लवंगे इ नी जोरदार खेळ केला.तर इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या पत्रकारांच्या टीम ने आर पी आय चा सहजगत्या पराभव केला.सागर आव्हाड, मिकी घई, सज्जाद सय्यद, सचिन जाधव, सचिन हंचाटे, विजय जगताप यांनी जोरदार खेळाचे प्रदर्शन केले.
मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट  या स्पर्धेत भाजप, शिवसेना, कॉँग्रेस, राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट,  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी असून ही स्पर्धा  गेम ऑन स्पोर्ट्स ग्राऊंड, म्हात्रे पुलाजवळ, कर्वेनगर, कोथरूड येथे  ३१ मे पर्यन्त सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत सुरू आहे.
या स्पर्धेची फायनल मॅच आणि बक्षीस समारंभ व समारोप बुधवार ३१ मे २०२३ रोजी सायंकाळीं ६:३० वा  पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि अभिनेते सुबोध भावे ,पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक,यांच्या सह सर्व पक्षीय प्रमुख, कलाकार, पत्रकार यांचे उपस्थितीत होणार आहे.  असे भीमयोद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. मंदार जोशी आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन चे संदीप खर्डेकर यांनी सांगितले.